गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी मालाड कुरार भुयारी मार्ग एक बाजूने पादचाऱ्यांसाठी खुला.
चौपदरी रस्ता, स्वतंत्र पादचारी मार्ग आणि अवजड वाहनांनाही सहज ये-जा करता येणाऱ्या भुयारी मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार असल्यामुळे कुरार गाव ते मालाड स्टेशनचा प्रवास आता सुस्साट होणार आहे. शिवसेना नेते खासदार गजानना किर्तीकर व मुख्य प्रतोद, आमदार माजी महापौर सुनील प्रभू यांच्या पाठपुराव्यातून तब्बल २६ कोटींच्या खर्चातून हे सुसज्ज रुंदीकरण करण्यात येत आहे. कुरार गाव येथील नागरिकांना मालाड स्टेशन गाठण्यासाठी चिंचोळ्या भुयारी मार्गातून जावे लागते. येथील लोकवस्तीही वाढल्याने या ठिकाणी होणाऱ्या गर्दीतून चालणेही मुश्कील होते. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, लाखो नागरिक आणि रुग्णालयात जाणारे रुग्ण यांची प्रचंड रखडपट्टी होत होती. वाहनांना मालाड स्टेशनवर जाण्यासाठी वळसा घालून जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर सुनील प्रभू यांनी एमएमआरडीकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. यामध्ये ३० मीटर रूंद, चार मीटर उंच हा भुयारी मार्ग बनवण्यात येणार असून दोन्ही बाजूला स्वतंत्र पादचारी मार्ग असणार आहेत. भुयारी मार्गाच्या रुंदीकरणामुळे लाखो कुरारवासीयांना मालाड स्टेशनवर जाण्यासाठी सलग सुसज्ज मार्ग मिळणार आहे. मुंबई मेट्रो लाईनच्या कामामूळे पश्चिम द्रुतगती मार्गावर कुरार सब वे मार्गाच्या रुंदीकरणाचे काम दिनांक ०९ सप्टेंबर,२०१७ पासून टप्प्या-टप्प्याने काम सुरू होते.
पहिल्या टप्प्यात मेट्रोसाठीच्या बॅरिकेटिंग मध्ये पाईल केल्या गेल्या असून आता दुसऱ्या टप्प्यात पश्चिम द्रुतगती मार्गाच्या संरक्षक भिंती सबळ करण्याचे काम सुरू करून पुढील टप्प्यात भिंती उंच करून पश्चिम द्रुतगती मार्गाची उंची वाढविली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करून आताच्या घडीला एक बाजू मोकळी झाली असून सप्टेंबर अखेर पर्यंत पूर्ण क्षमतेने भुयारी मार्ग तयार होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अन्सारी यांनी दिली. तसेच मेट्रोच्या कामामुळे भुयारी मार्गाच्या कामाला परवानग्या न मिळाल्याने विलंब झाला असला तरी कोरोना काळात वाहनांची वर्दळ कमी असल्याने काम वेगाने पूर्ण करता आले असे कार्यकारी अभियंता अन्सारी म्हणाले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरळीत वाहतूक होणार.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक रहिवाश्यांच्या मागणीवरून एमएमआरडिए प्राधिकरणाने नागरिकांच्या सोयीसाठी पादचाऱ्यांसाठी रस्ता खुला केला असून आज आमदार सुनिल प्रभू यांनी कार्यकारी अभियंता अन्सारी व कनिष्ठ अभियंता फरहान यांचे सोबत पाहणी केली व पादचाऱ्यांना व गणेश भक्तांना सुरळीत वाहतूक सुविधा देण्याच्या सूचना दिल्या.